Seeds of Swaraj on Rocky Soil: सेवाग्रामचा ऐतिहासिक महत्त्व

रवी चांदेकरवर्धा : खडकाळ माती आणि विरळ वस्तीच्या या साध्या परिसरात महात्मा गांधींच्या आगमनाने एक नवा विचारधारा जन्माला आला. ३० एप्रिल १९३६ रोजी बापूंनी येथे पाऊ
रवी चांदेकरवर्धा : खडकाळ माती आणि विरळ वस्तीच्या या साध्या परिसरात महात्मा गांधींच्या आगमनाने एक नवा विचारधारा जन्माला आला. ३० एप्रिल १९३६ रोजी बापूंनी येथे पाऊल ठेवले आणि या भूमीतून स्वातंत्र्य, स्वराज्य, स्वावलंबन आणि ग्रामोत्थानाचा विचार आकार घेत गेला. 'आदी निवास'च्या साध्या कुटीत देशाच्या भवितव्यावर चर्चा झाली, 'चले जाव'चा ऐतिहासिक ठराव येथे झाला आणि सेवाग्राम भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान मिळवले. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच श्रमप्रतिष्ठा, शिक्षण, ग्रामविकास आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देणारी ही भूमी आजही गांधीविचारांची जिवंत साक्ष आहे. सेवाग्रामच्या आश्रमात गांधीजींच्या विचारांची जडणघडण झाली आणि त्याचा प्रभाव आजही दिसून येतो.
१९३६ पूर्वी हे गाव 'शेगाव' म्हणून ओळखले जात होते. वर्ध्यापासून जवळ असूनही त्या काळात येथे आधुनिक सुविधांचा अभाव होता. गजानननगरी शेगाव आणि हे गाव अशी दोन समान नावे असल्याने निर्माण होणारा संभ्रम टाळण्यासाठी 'सेवाग्राम' हे नाव रूढ झाले. बापू येथे सेवाभावाने आले होते, त्यामुळे त्यांच्या कार्याशी सुसंगत असे हे नाव गावाच्या ओळखीचा भाग बनले. आश्रमासाठी अवघी दीड एकर जमीन होती. श्रमदानातून त्याच भूमीवर शेती फुलली, गोशाळा उभी राहिली आणि कार्यकर्त्यासाठी निवासस्थाने आकाराला आली. सुरुवातीच्या ताटव्यांच्या साध्या झोपडीतूनच गांधीजींनी आंदोलनांचे नेतृत्व केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्णायक लढ्याची दिशा ठरविणारे हे ठिकाण साक्षीदार ठरले.





















