Protests in Jharkhand: झारखंडमध्ये पेपरफुटी विरोधातील आंदोलन तीव्र; विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा

झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. आज आंदोलकांनी विधानसभेच्या दिशेने मोठा मोर्चा काढला, ज्यात हजारो विद्यार्थी सहभागी झाल
झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. आज आंदोलकांनी विधानसभेच्या दिशेने मोठा मोर्चा काढला, ज्यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. 'विधानसभा घेराव' या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते, परंतु आंदोलकांनी त्यांना ओलांडून पुढे जात विधानभवनाकडे वाटचाल सुरू ठेवली. रांचीमध्ये या आंदोलनात भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे. दुसरीकडे, भाजपाचे काही नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करत असताना, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचा गंभीर आरोप करत गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. आजच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी झारखंडच्या विविध भागांतून विद्यार्थी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. रांचीतील कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता, पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या विविध जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी राजधानी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांनी बस, वाहनांची तपासणी करत आहेत आणि प्रमुख रस्त्यांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. आंदोलकांनी विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. पीटीआयच्या माहितीनुसार, पोलिसांनी भाजपाचे नेते आदित्य साहू आणि बाबूलाल मरांडी यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेतले आहे. आंदोलकांनी पेपरफुटी आणि अन्य गैरव्यवहारांबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे १३ परीक्षांपैकी १० रद्द करण्याची मागणी केली आहे, परंतु सरकारने फक्त तीन परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर, आंदोलकांची समजूत काढण्यासाठी सरकारने प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही.


















