Large Language Models: AI मुळे मराठी साहित्याचा वारसा धुळीस मिळणार?

अमेरिकेतील एका अत्याधुनिक लॅबमध्ये चालणाऱ्या मशीनच्या खडखडाटात, शतकांपूर्वीच्या दुर्मीळ ग्रंथांच्या पानांची कापणी केली जात आहे. या प्रक्रियेत पुस्तकांची पानं सु
अमेरिकेतील एका अत्याधुनिक लॅबमध्ये चालणाऱ्या मशीनच्या खडखडाटात, शतकांपूर्वीच्या दुर्मीळ ग्रंथांच्या पानांची कापणी केली जात आहे. या प्रक्रियेत पुस्तकांची पानं सुटी करून त्यांना हाय-स्पीड स्कॅनरखाली ठेवले जाते आणि स्कॅनिंग झाल्यावर त्या पानांना थेट शेडरमध्ये टाकले जाते. या प्रकारामुळे ज्या पुस्तकांनी मानवाला विचार करण्याची प्रेरणा दिली, त्यांचे अस्तित्व काही मिनिटांत मिटले जाते. हे सर्व केवळ एका कृत्रिम बुद्धिमत्तेला 'स्मार्ट' बनविण्यासाठी घडत आहे. आज जगभरात AI कंपन्यांच्या भुकेमुळे पुस्तकांचा विनाश सुरू आहे, ज्याला तांत्रिक भाषेत 'डिस्ट्रक्टिव्ह स्कॅनिंग' म्हटले जाते. हे फक्त परदेशातील तांत्रिक घडामोड नाही, तर मानवी संस्कृतीवर, विशेषतः महाराष्ट्रासारख्या साहित्यिक परंपरेवर एक मोठा हल्ला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात, एक अभूतपूर्व शर्यत सुरू आहे, जिथे चिप्स आणि कॉम्प्युटिंग पॉवरच्या लढाईत आता कागदी पुस्तकांचा समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिकेतील पुस्तकविक्रेत्यांकडून दुर्मीळ, जुनी आणि स्वस्त पेपरबॅक पुस्तकं मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहेत, ज्यामध्ये AI कंपन्यांचे एजंट सक्रिय आहेत. अँथ्रॉपिक या अमेरिकन AI कंपनीविरुद्ध दाखल झालेल्या कॉपीराईट खटल्यात या प्रकाराची माहिती समोर आली आहे. 'द गार्डियन' आणि 'द वॉशिंग्टन पोस्ट'च्या तपासात अँथ्रॉपिकच्या 'प्रोजेक्ट पनामा'ची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अनेक दुर्मीळ पुस्तकं विकत घेऊन नष्ट केली गेली आहेत, ज्यांच्या जगात केवळ एक-दोनच प्रती शिल्लक होत्या. या प्रकारामुळे इतिहास घडवणाऱ्या पुस्तकांचा अनादर होत आहे. AI कंपन्या पुस्तकांकडे केवळ अक्षर, शब्द आणि व्याकरणाचे नमुने म्हणून पाहतात, परंतु भौतिक पुस्तक हे मानवी समाजाचा जिवंत आरसा आहे. चॅटजीपीटी, क्लॉड किंवा जेमिनीसारखी लार्ज लँग्वेज मॉडेल्स माणसाने लिहिलेल्या मजकुरावरून भाषा शिकतात, परंतु आता कंपन्यांसमोर काही मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हंबोल्ट युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनचे प्राध्यापक जॅनिस लेनार्ट्झ यांच्या मते, २००० च्या दशकातील 'गूगल बुक्स' प्रकल्प आणि सध्याच्या AI स्कॅनिंगमध्ये मोठा फरक आहे. जरी ही घटना परदेशात घडत असली तरी, भविष्यात मराठी साहित्याला याचा मोठा फटका बसू शकतो. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अरुल जॉर्ज स्कॅरिया यांच्या मते, भारतीय कॉपीराईट कायद्यानुसार यावर अद्याप स्पष्टता नाही. तज्ज्ञांच्या मते, AI कंपन्यांनी पुस्तकाची एक प्रत विकत न घेता, 'डेटा परवाना करार' केला पाहिजे आणि लेखकांना योग्य रॉयल्टी दिली पाहिजे. दुर्मीळ पुस्तकांच्या विनाशावर बंदी घालणे आवश्यक आहे. पुस्तक हे केवळ कागद आणि शाईचं संयोजन नसून, ते विचार, नागरिकता आणि सामाजिक क्रांती यांचं जिवंत माध्यम आहे. महाराष्ट्रात ज्या पुस्तकांनी सत्यशोधक समाज घडवला, दलित साहित्यातून शोषितांना आवाज दिला आणि तरुण पिढीला विचार करायला भाग पाडलं, त्या पुस्तकांना AI च्या 'पेट्रोल' समजून नष्ट करणं ही सांस्कृतिक घसरण आहे.



















