Tragic Shooting in Thailand: थायलंडच्या शाळेत भयंकर गोळीबार; शिक्षिकेचा मृत्यू, १५ जण जखमी

थायलंडच्या नंथबुरी प्रांतातील एका प्रसिद्ध शाळेत शुक्रवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका शिक्षिकेचा
थायलंडच्या नंथबुरी प्रांतातील एका प्रसिद्ध शाळेत शुक्रवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, हल्लेखोर विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. 'रॉयटर्स' आणि 'सीएनएन' या वृत्तसंस्थांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. या गोळीबाराची घटना बँकॉकच्या उत्तरेकडील 'डेबसिरिन नंथबुरी स्कूल' येथे घडली, जिथे सुमारे ३,००० विद्यार्थी शिकत आहेत. बचाव कार्य करणाऱ्या 'पोह टेक तुंग फाउंडेशन' आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. जखमींपैकी एकाची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हींचा समावेश आहे.
नंथबुरी प्रांतीय पोलीस कमांडर लेफ्टनंट कर्नल डेचरापी कोंगडी यांनी याबाबत माहिती दिली की, संशयित बंदूकधारी हा याच शाळेतील विद्यार्थी होता. त्याने हल्ल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. थायलंडच्या 'सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो'ने याबाबत स्पष्ट केले आहे की, परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. आग्नेय आशियातील इतर देशांच्या तुलनेत थायलंडमध्ये शस्त्रास्त्रांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. 'स्मॉल आर्म्स सर्व्हे' (SAS) च्या २०१७ च्या अहवालानुसार, थायलंडमध्ये नागरिकांकडे १ कोटी ३ लाखांपेक्षा जास्त शस्त्रे आहेत, म्हणजे दर १०० लोकांमागे १५ बंदुका आहेत. यामुळे थायलंडमध्ये बंदुकीच्या हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे.



















