Police Verification Mandatory: शिर्डीत रिक्षाचालक, भाडेकरू, व्यावसायिकांना पोलीस पडताळणी बंधनकारक

राहाता: शिर्डी शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी रिक्षा चालक, भाडेकरू आणि फुटपाथवरील व्यावसायिक यांच्यासाठी पोलीस पडत
राहाता: शिर्डी शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी रिक्षा चालक, भाडेकरू आणि फुटपाथवरील व्यावसायिक यांच्यासाठी पोलीस पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी याबाबत माहिती दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील प्रामाणिक व्यावसायिकांना फायदा होईल आणि गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल. शिर्डीत दररोज हजारो भाविक येत असल्याने रिक्षा, हॉटेल, फुटपाथवरील विक्री यासारख्या व्यवसायांचा मोठा प्रमाणात विकास झाला आहे. तथापि, यामध्ये काही बोगस आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक असल्याने भाविकांची फसवणूक आणि अन्य गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून शिर्डी पोलिस ठाणे, वाहतूक शाखा, नगर परिषद आणि साईबाबा संस्थान यांच्या समन्वयाने आता प्रत्येक रिक्षा चालक, फुटपाथ विक्रेता आणि दुकानदार यांची पोलीस पडताळणी करणे अनिवार्य केले आहे. यामुळे प्रामाणिक व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे.
उपनगराध्यक्ष शेळके यांनी स्पष्ट केले की, शिर्डी हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे आणि येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. रिक्षा चालक आणि फुटपाथवरील व्यावसायिक यांची पोलीस पडताळणी केल्याने कोणताही संशयास्पद व्यक्ती शहरात व्यवसाय करू शकणार नाही. यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना आणि फेरीवाल्यांना मोठा फायदा होईल. त्यांचा व्यवसाय वाढेल आणि भाडेकरूंची माहिती देखील तपासली जाईल, ज्यामुळे शहराची प्रतिमा उंचावेल आणि भाविकांचा विश्वास वाढेल.





















