Driver loses control; four youths from Maval die in accident: चालकाचे नियंत्रण सुटले; मावळातील ४ युवकांचा अपघातात मृत्यू

पवनानगर: पुणे–सातारा महामार्गावर (nh-48) शिरवळ येथे मंगळवारी, ११ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात मावळ तालुक्यातील चार युवकांचा मृत्यू
पवनानगर: पुणे–सातारा महामार्गावर (NH-48) शिरवळ येथे मंगळवारी, ११ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात मावळ तालुक्यातील चार युवकांचा मृत्यू झाला, तर दोन युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात शिरवळ येथील हॉटेल शिवालयासमोर रात्री १.१० वाजण्याच्या सुमारास झाला. प्राथमिक माहितीनुसार, एक कार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. अचानक चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर ती पलटी होऊन विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली. समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून कारचा चक्काचूर झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या युवकांमध्ये वेदांत अर्जुन वारिंगे (१९, तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९, कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, टाकवे) आणि निखिल बाळू राऊत (२०, कामशेत) यांचा समावेश आहे. या अपघातामुळे मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.
अपघातात जखमी झालेल्या युवकांमध्ये दीक्षित दयानंद पुजारी (२०, कामशेत) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०, बहुर, कामशेत) यांचा समावेश आहे. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्रातील अधिकारी आणि अंमलदार तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आणि त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.




















