Mumbai Local Video: मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलेला बेदम मारहाण; बेल्ट काढून धमकावले, १२ तासांत आरोपीला बेड्या

मुंबईतील हार्बर मार्गावरील गोरेगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पुरुष प्रवाशाने डॉली साहू या महिला प्रवाशा
मुंबईतील हार्बर मार्गावरील गोरेगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पुरुष प्रवाशाने डॉली साहू या महिला प्रवाशावर अचानक हल्ला केला. हा प्रकार बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडला, जेव्हा आरोपी मोहम्मद रिझवान अन्सारी (वय ३६) जोगेश्वरी स्टेशनवरून लोकलमध्ये चढला. त्या वेळी डॉली एका आसनावर झोपली होती, त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यानंतर बेल्ट काढून तिला धमकावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये इतर सहप्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
या घटनेनंतर वडाळा रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला गोवंडी परिसरातून ताब्यात घेतले. मात्र, डॉलीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नसल्याने अंधेरी रेल्वे पोलिसांनी तिला शोधून काढले. या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ७४, २९६, ११५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवते यांनी दिली. हा प्रकार मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत एक गंभीर चिंता निर्माण करतो.





















