Water Level in Almatti Dam:अलमट्टी धरणातील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर, कर्नाटककडून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कपात

कोल्हापूर : कर्नाटकात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक नसली तरी, तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी खोऱ्यातील पाण्याची आवक वाढली
कोल्हापूर : कर्नाटकात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक नसली तरी, तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी खोऱ्यातील पाण्याची आवक वाढली आहे. या पावसामुळे अलमट्टी धरणातील पाणीसाठा लक्षणीय वाढला असून, सध्या धरणात १०६.४७३ टीएमसी म्हणजेच ८६.५० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात सुमारे १६.६० टीएमसी पाण्याची साठवण क्षमता अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे कर्नाटक जलसंपदा विभागाने आगामी पावसाच्या पार्श्वभूमीवर धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दहा तासांत धरणात सरासरी १ लाख ७ हजार ५०० क्यूसेक पाण्याची आवक झाली आहे. त्याच प्रमाणात विसर्गही करण्यात आला. तथापि, सायंकाळी ६ वाजता नदीपात्रात प्रत्यक्ष सोडण्यात येणारा विसर्ग फक्त ४२ हजार ५०० क्यूसेक इतका ठेवण्यात आला आहे, जो यापूर्वी दीड लाख क्यूसेकपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात लक्षणीय घट झाली आहे.
कर्नाटक जलसंपदा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी आलमट्टी धरणाची जलपातळी ५१८.५९ मीटर आहे, तर धरणाची पूर्ण जलसाठा पातळी (एफआरएल) ५१९.६० मीटर आहे. धरणाची कमाल साठवण क्षमता १२३.०८१ टीएमसी आहे. सध्या धरणातील उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा ८८.८५३ टीएमसी इतका आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र जलसंपदा विभागाने अलमट्टी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे आणि धरणात पुरेसा साठा उपलब्ध झाल्याने कर्नाटक प्रशासनाने विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक जलसंपदा विभागाच्या मते, सध्याचा पाणीसाठा सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांसाठी पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता कमी झाली आहे.





















