Turmeric Market Shock: हळदीच्या दरात अचानक घसरण

हिंगोली : हळदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला अचानक ब्रेक लागला आहे. वायदे बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीचा थेट परिणाम हिंगोली कृषी उत्पन्
हिंगोली : हळदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला अचानक ब्रेक लागला आहे. वायदे बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीचा थेट परिणाम हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीच्या दरावर झाला आहे. गुरुवारी हळदीच्या दरात क्विंटलमागे सुमारे ५०० ते १,००० रुपयांची घसरण झाली, ज्यामुळे शेतकरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली मार्केट यार्ड हा मराठवाडा आणि विदर्भातील हळदीची प्रमुख बाजारपेठ मानला जातो. मे आणि जून महिन्यात येथे हळदीला १२,५०० ते १३,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. खरीप हंगामातील पेरणी आणि इतर शेतीखर्च भागविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित दर नसतानाही या काळात हळद विकावी लागली होती.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हळदीच्या बाजारात मोठा बदल झाला होता. दर्जेदार हळदीच्या दराने हिंगोली बाजारात १८ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. दुसरीकडे वायदे बाजारात हळदीच्या दराने थेट २२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मजल मारली होती. या तेजीमुळे हळद उत्पादकांमध्ये दर आणखी वाढतील, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी उपलब्ध मालाची विक्री न करता तो साठवून ठेवला. मात्र, आता बाजारात अचानक झालेल्या घसरणीमुळे माल रोखून ठेवणाऱ्यांची चिंता वाढली आहे.



















