Success of ET-IVF Technology:ईटी-आयव्हीएफ तंत्रज्ञानाला मोठे यश

मुंबई: अत्याधुनिक भ्रूण हस्तांतरण व आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुऱ्हा जातीच्या चार निरोगी रेडकांचा जन्म झाला आहे. यामध्ये ३ मादी व १ नर यांचा समावेश आह
मुंबई: अत्याधुनिक भ्रूण हस्तांतरण व आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुऱ्हा जातीच्या चार निरोगी रेडकांचा जन्म झाला आहे. यामध्ये ३ मादी व १ नर यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पशुधन संवर्धन व उच्च आनुवंशिक क्षमतेच्या निर्मितीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या यशामुळे राज्यातील दुग्ध उत्पादन क्षेत्रात एक नवा बदल घडवून आणण्याची शक्यता आहे. पुण्यातील ताथवडे येथील ईटी-आयव्हीएफ प्रयोगशाळा व शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रात हा प्रयोग यशस्वी झाला. यासाठी वाकज येथील स्वप्नील कलाटे यांच्या उच्च दुग्ध उत्पादक मुऱ्हा म्हशीचा दाता म्हणून वापर करण्यात आला. एका स्त्रीबीज संकलन सत्रात एकूण १७ अंडपेशी संकलित करण्यात आल्या, त्यापैकी ५ उच्च दर्जाचे भ्रुण विकसित करण्यात आले. हे पाचही भ्रुण दाई म्हशींमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. यामध्ये ४ म्हशी गर्भधारणा करण्यात यशस्वी ठरल्या आणि त्यांपासून ३ मादी व १ नर अशा एकूण चार निरोगी रेडकांचा जन्म झाला. या प्रक्रियेत सर्व तांत्रिक कामे राज्य नोडल अधिकारी डॉ. विष्णू जवणे यांनी यशस्वीरित्या पार केली. सहाय्यक आयुक्त डॉ. रतिकांत नवटके यांनी दाई म्हशींच्या आरोग्य तपासणी व माज नियमनाचे काम पाहिले. या प्रकल्पाची अंमलबजावणी शासकीय गोठीत रेत निर्मिती केंद्र खडकी, पुणे येथील विभागीय व्यवस्थापक डॉ. उदय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उच्च आनुवंशिक क्षमतेच्या म्हशींची जलद निर्मिती व उत्कृष्ट दुग्ध उत्पादन क्षमतेच्या पशुधनाचा प्रसार यासाठी हे तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ईटी-आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक विस्तार करण्यात येत आहे. नवीन क्षेत्रीय उपक्रम हाती घेतले आहेत. सर्व शासकीय गोठीत रेत निर्मिती केंद्रासाठी आवश्यक सर्व जातीच्या उच्च वंशावळीचे वळू निर्माण करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम होईल आणि राज्यातील पशुधन उत्पादनात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या यशामुळे पशुधन क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रात एक नवी क्रांती घडवून आणली जाईल.



















