Historic Friendship Celebration:कोल्हापूरमध्ये पोलिश शिष्टमंडळाची भेट

कोल्हापूर : इतिहास हा केवळ कागदावरच्या पानांवरच नाही, तर तो माणसांच्या मनावर आणि परस्परांच्या आदरभावात कायमचा कोरलेला असतो. भूतकाळातील वेदनांवर आधाराची फुंकर बस
कोल्हापूर : इतिहास हा केवळ कागदावरच्या पानांवरच नाही, तर तो माणसांच्या मनावर आणि परस्परांच्या आदरभावात कायमचा कोरलेला असतो. भूतकाळातील वेदनांवर आधाराची फुंकर बसते, तेव्हा त्याची गोड फळे पिढ्यानपिढ्या साजरी केली जातात. याच ऐतिहासिक आणि जिव्हाळ्याच्या भावनेला उजाळा देणारी एक महत्त्वाची घटना करवीर नगरीत घडली. पोलंडच्या संसद सदस्या आणि पोलंड-भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायेव्स्का यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय पोलिश शिष्टमंडळाने कोल्हापूरला सदिच्छा भेट दिली. ही भेट केवळ दोन देशांमधील राजकीय संबंधांपुरती मर्यादित नव्हती, तर ती होती दोन संस्कृतींमधील अतुट आपुलकी आणि कृतज्ञतेचा उत्सवच जणू! दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा जगभरात अशांतता आणि संकटांचे काळे ढग दाटले होते, तेव्हा कोल्हापूरच्या भूमीने आणि तत्कालीन छत्रपतींनी पोलिश बांधवांना केवळ आश्रयच दिला नाही, तर त्यांना हक्काचे घर दिले. या भेटीदरम्यान पोलिश शिष्टमंडळाने याच ऐतिहासिक आठवणींना भावूक होऊन उजाळा दिला. याविषयी बोलताना पोलिश बांधवांनी भावना व्यक्त केल्या. ”आमच्या पूर्वजांना या मातीने संकटकाळात पोरके होऊ दिले नाही. याच भूमीने सुमारे पाच हजार पोलिश पुरुष, महिला आणि बालके यांना आश्रय दिला, त्यांना सन्मानाचे आयुष्य नव्याने उभारण्याचे बळ दिले. आमच्या संस्कृतीच्या श्रद्धा, परंपरा आणि रीतीरिवाज आम्ही येथे जपले. आमच्या मुलांना शिक्षणाचा प्रकाश मिळाला आणि या मातीतच अशा काही सुंदर आठवणी निर्माण झाल्या, ज्या पिढ्यानपिढ्या आमच्या हृदयात कायम टिकून राहतील,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कोल्हापूरच्या मातीशी आणि येथील लोकांच्या विशाल मनाशी जुडलेले हे ऋणानुबंध आजही तितकेच ताजे आणि जिवंत आहेत, याची प्रचिती या भेटीने दिली. जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच, भारत आणि पोलंड यांच्यातील सांस्कृतिक व मैत्रीचे संबंध भविष्यात आणखी कसे दृढ करता येतील, यावरही या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. कोल्हापूरच्या आतिथ्याने आणि येथील संस्कृतीने पोलिश शिष्टमंडळाचे मन जिंकले, आणि ही भेट दोन्ही देशांमधील मैत्रीच्या इतिहासात एक सुवर्णपान म्हणून कायमची कोरली गेली! पोलंड आणि भारताच्या सामायिक इतिहासातील एका सुवर्ण अध्यायाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आल्याची भावना पोलंड प्रजासत्ताकाच्या संसदीय शिष्टमंडळाचे स्वागत करताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केली. पोलंडच्या संसद सदस्या व पोलंड-भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायेव्स्का यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय पोलिश शिष्टमंडळाने कोल्हापूरला भेट दिली. या शिष्टमंडळाचे स्वागत जिल्हाधिकारी डॉ. राठोड आणि युवराज संभाजीराजे यांनी केले. यावेळी महापौर रूपाराणी निकम, महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅस्मिन, संयोगिताराजे छत्रपती, मुंबई येथील पोलंडचे वाणिज्य दूत तोमास्क विएलगोमास, नवी दिल्ली येथील पोलीस इन्स्टिट्यूटच्या संचालक व मंत्री मालगोझावेयसिस, तोकर्नल गायकवाड, कर्नल वाजपेयी उपस्थित होते. पोलंडचे पंतप्रधान या वर्षाच्या उत्तरार्धात भारताला भेट देणार आहेत. ही केवळ एक राजनैतिक भेट नसून इतिहास, मानवता आणि मैत्रीचे पुनर्मिलन आहे.





















