Goa's Cultural Heritage on Screen: गोव्याचा खरा वारसा पडद्यावर साकारा; मुख्यमंत्र्यांचे निर्मात्यांना आवाहन

पणजी: गोव्याची ओळख केवळ बार आणि समुद्रकिनाऱ्यांपुरती मर्यादित न ठेवता राज्याची समृद्ध संस्कृती, परंपरा, मंदिरे आणि ऐतिहासिक वारसा मोठ्या पडद्यावर साकारण्याचे आव
पणजी: गोव्याची ओळख केवळ बार आणि समुद्रकिनाऱ्यांपुरती मर्यादित न ठेवता राज्याची समृद्ध संस्कृती, परंपरा, मंदिरे आणि ऐतिहासिक वारसा मोठ्या पडद्यावर साकारण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चित्रपट निर्मात्यांना केले. पणजीतील आयनॉक्समध्ये विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित १५व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उद्घाटन सोहळ्याला गोवा मनोरंजन संस्थेच्या अध्यक्षा आमदार डिलायला लोबो, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर आणि मोहन जोशी तसेच विन्सन वर्ल्डचे संजय शेट्ये आणि श्रीपाद शेट्ये उपस्थित होते. ‘बंडखोर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोव्याला समृद्ध आणि गौरवशाली इतिहास लाभला आहे. हिरा गुरजी, पुरुषोत्तम काकोडकर आणि टी. बी. कुन्हा यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात चित्रपट माध्यमाची महत्त्वाची भूमिका ठरू शकते. त्यामुळे गोव्याच्या इतिहासावर आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर आधारित अधिकाधिक चित्रपटांची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठी आणि कोकणी चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध सवलती दिल्या जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) मार्फत स्थानिक तसेच बाहेरील निर्मात्यांना आवश्यक सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोहन जोशी यांचा ‘कृतज्ञता पुरस्काराने’ गौरव: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. गोवा मराठी चित्रपट महोत्सवात यंदा मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले आहेत. सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, अमेय वाघ, जितेंद्र जोशी, सुबोध भावे, गजेंद्र अहिरे, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक कलाकारांची उपस्थिती महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.





















