Tragic Bus Accident in Mulund: मुलुंड चेक नाक्यावर बेस्ट बसचा भीषण अपघात; ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबईतील मुलुंड चेक नाक्यावर गुरुवारी (७ ऑगस्ट) एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास, रस्त्यावर चाललेल्या एका बेस्ट बसने ५६ वर्षीय जयश्र
मुंबईतील मुलुंड चेक नाक्यावर गुरुवारी (७ ऑगस्ट) एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास, रस्त्यावर चाललेल्या एका बेस्ट बसने ५६ वर्षीय जयश्री भानाजी परमार यांना धडक दिली. या अपघातात जयश्री यांचा मृत्यू झाला. बस क्रमांक ८०३४ (MH 01 EM 1891) नेरूळ बस स्थानकावरून मुलुंड चेक नाक्याच्या दिशेने जात होती. बस सिग्नलवर थांबली असताना, जयश्री रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. सिग्नल हिरवा झाल्यावर बसचा चालक रवी भगवान भोईसे (वय ३३) बस पुढे नेला, त्याचवेळी जयश्री यांचा बसच्या उजव्या कोपऱ्याला स्पर्श झाला आणि त्या खाली पडल्या. दुर्दैवाने, बसचे उजव्या बाजूचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांना गंभीर जखम झाली.
अपघातानंतर बसमधील वाहक शैलेश सुधाकर वाघ (वय २६) याने तात्काळ पोलिसांच्या १०० क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मुलुंड पोलीस आणि बेस्टचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी जयश्री यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून आगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, कारण आज बेस्टचा स्थापना दिन आहे.



















