Murder in Hingoli: हिंगोलीतील तरुणाचा विदर्भातील जंगलात खून;आठ जणांना अटक

हिंगोली शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय तरुणाचा खून यवतमाळ जिल्ह्यातील सत्तरमाळ जंगलात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येसाठी सहा लाख रुप
हिंगोली शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय तरुणाचा खून यवतमाळ जिल्ह्यातील सत्तरमाळ जंगलात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येसाठी सहा लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात आठ संशयितांना अटक केली असून, हत्येमागील कारणे आणि मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. मंगेश उर्फ काल्या मनवर हा तरुण २ ऑगस्ट रोजी कामावर गेला होता, परंतु रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा ठावठिकाणा न लागल्याने ४ ऑगस्ट रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्तरमाळ जंगलात एक मृतदेह आढळून आला. गळ्यावर आणि पाठीवर वार केल्याच्या खुणा असल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू असताना तो मंगेश मनवर याचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर यवतमाळ पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. गुन्हे शाखेचे पथक हिंगोलीत दाखल झाले. हिंगोली शहर पोलिसांचे जमादार अशोक धामणे यांच्या मदतीने माहिती संकलित केल्यानंतर संशयितांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी ज्ञानेश्वर राठोड, राहुल लोखंडे, श्रावण भवाळ, सोमनाथ हजारे, विशाल राठोड, अर्जुन शेळके, दीपक जाधव आणि सिद्धार्थ जाधव (सर्व रा. वाशीम जिल्हा) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी सहा लाख रुपयांच्या सुपारीसाठी मंगेशचा खून केल्याची माहिती दिली. या हत्येमागील मुख्य सूत्रधार, सुपारी देण्याचे कारण आणि आर्थिक व्यवहाराचा तपशील शोधण्यासाठी खंडाळा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





















