Drug Bust in Nagpur: नागपूरमध्ये मादक पदार्थ तस्करांना जेरबंद केले

नागपूर शहरात मादक पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे. गेल्या २४ तासांत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाच रात्री पाच तस्करांना अट
नागपूर शहरात मादक पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे. गेल्या २४ तासांत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाच रात्री पाच तस्करांना अटक केली. या कारवायांमध्ये एमडी (मेफेड्रोन) आणि गांजासह सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमुळे शहरातील नशेच्या साखळीवर मोठा धक्का बसला आहे. स्वामीनगर परिसरात स्कॉर्पिओ कारमधून अंमली पदार्थांचा व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली. पथकाने मुकर्रम मुनावर अली काजी आणि दानिश खान यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ११ ग्रॅम आणि १० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. याशिवाय, त्यांच्या कारमधून दोन मोबाइल फोन आणि स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली. या दोघांनी सांगितले की, त्यांनी हा साठा मोमिनपुरा येथील सैयद इरफान अलीकडून आणला होता, ज्याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा टीमने महाल परिसरात रेशन दुकानाजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या सलीम खान ऊर्फ चावल साजिद खान याला पकडले. त्याच्याकडून ३२.२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरात झडती घेतली असता, आणखी ६७.८१ ग्रॅम एमडी सापडले. एकूण १०५.०२ ग्रॅम एमडी, दोन मोबाइल फोन, सोन्याची अंगठी आणि मोपेड असा १३.३० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चौकशीत सलीमने हा माल हडकेश्वर परिसरातील संजय कलिया याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यामुळे संजय कलिया याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.





















