IPO Fundraising:धूत ट्रान्समिशनने उभारले ९१८ कोटी

मुंबईतील धूत ट्रान्समिशन लिमिटेड, जी ऑटो घटकांच्या निर्मितीत अग्रगण्य आहे, तिने प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) सुरू होण्याच्या काही दिवस आधी अँकर गुंतवणूकदारांक
मुंबईतील धूत ट्रान्समिशन लिमिटेड, जी ऑटो घटकांच्या निर्मितीत अग्रगण्य आहे, तिने प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) सुरू होण्याच्या काही दिवस आधी अँकर गुंतवणूकदारांकडून ९१८.३ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. या अँकर फेरीत ब्लॅकरॉक, अबु धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि एसबीआय म्युच्युअल फंड यांसारख्या प्रमुख जागतिक आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला. बीएसईवर शुक्रवारी उशिरा दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ७२ अँकर फंड्सना प्रति शेअर ८७१ रुपये या दराने १.०५ कोटींपेक्षा जास्त इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. अँकर वाटपामध्ये देशांतर्गत म्युच्युअल फंडांचा सर्वाधिक वाटा राहिला, ज्यामध्ये आठ फंड हाऊसेसने आपल्या ४६ योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक केली. त्यांना एकूण ६४.६० लाख शेअर्स देण्यात आले, जे अँकर बुकच्या तब्बल ६१.२७ टक्के आहे. या अँकर बुकमध्ये एसबीआय, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एचडीएफसी, अॅक्सिस, मिराए अॅसेट यांसारख्या म्युच्युअल फंडांसह व्हाईटओक, गव्हर्नमेंट पेन्शन फंड, अमुंडी फंड्स, अलियान्झ ग्लोबल इन्व्हेस्टर्स आणि विमा कंपन्या देखील गुंतवणूक करत आहेत.
कंपनीचा ३,०६७ कोटी रुपयांचा आयपीओ १० ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान सार्वजनिक वर्गणीसाठी खुला होणार आहे. यासाठी प्रति शेअर ८२९ ते ८७१ रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये १,४०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स (Fresh Issue) जारी केले जाणार असून, उर्वरित १.९१ कोटी शेअर्स प्रवर्तक घटकांद्वारे ‘ऑफर फॉर सेल’ अंतर्गत विकले जातील. या ओएफएसमध्ये बीसी एशिया इन्व्हेस्टमेंट्स (बॅन कॅपिटलची संस्था) आणि मंगलम कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आपले शेअर्स विकत आहेत. नवीन भागविक्रीतून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी आपले आणि आपल्या उपकंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. तसेच, हरियाणातील झज्जर आणि तामिळनाडूतील होसूर येथे नवीन ‘वायरिंग हार्नेस’ उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाईल. याशिवाय, काही हिस्सा धोरणात्मक अधिग्रहांसाठी वापरला जाणार आहे. किंमत पट्ट्याच्या उच्च टप्प्यानुसार कंपनीचे बाजार भांडवल (Market Cap) सुमारे १७,८१६ कोटी रुपये असेल.





















