Dog Bites in Kalyan:कल्याणमध्ये दोन दिवसांत २०० नागरिकांना श्वानदंश

कल्याण शहरात दोन दिवसांच्या कालावधीत २०० हून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली आहे. सोमवारी, रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण कक्ष
कल्याण शहरात दोन दिवसांच्या कालावधीत २०० हून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली आहे. सोमवारी, रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण कक्षात भटक्या कुत्र्यांनी चावलेले रुग्ण दर १० मिनिटांच्या अंतराने उपचारासाठी येत होते. या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले तरीही त्यांची संख्या वाढतच आहे, याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. रविवारी, हॉटेल संदीप ते खडकपाडा परिसरात भटक्या कुत्र्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या १३० नागरिकांना चावा घेतला. यामध्ये एक ११ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला मुंबईतील शीव रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. खडकपाडा व महात्मा फुले पोलिस स्टेशन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या श्वान नियंत्रण पथकाने भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यास रविवारी रात्रीच सुरुवात केली आहे.
सोमवारी सकाळपासून कल्याण स्टेशन परिसरातही ५० हून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. या सर्व जखमींनी रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात दिवसभर चावलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. लातूरच्या निलंगा येथील नवाज शेख चप्पल दुकानासाठी लागणारा माल घेण्यासाठी कल्याणमध्ये आले होते, त्यावेळी रेल्वे स्टेशनवर त्यांच्या पायाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला. याशिवाय, ज्योती यादव या विद्यार्थिनीवर आणि नितीन आमलाणे यांच्यावर स्टेशन परिसरात भटक्या कुत्र्याने हल्ला केला. भाजी विक्रेते अक्षयकुमार कुशावह यांना सिनेमा घराजवळ कुत्र्याने चावा घेतला.





















