Action Against Illegal Hoardings: पुणे महानगर क्षेत्रात १३४ अनधिकृत होर्डिंग्जवर हातोडा ‘पीएमआरडीए’ची धडक कारवाई

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जवर कठोर कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाने आतापर्यंत ८२८ होर्डिंग्जचे सर
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जवर कठोर कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाने आतापर्यंत ८२८ होर्डिंग्जचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, ३७१ होर्डिंगधारकांना नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये १३४ अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत. पुणे महानगर क्षेत्रात विविध ठिकाणी परवानगीशिवाय होर्डिंग्ज उभारण्यात आल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. काही होर्डिंग्ज धोकादायक स्थितीत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई अत्यंत आवश्यक आहे. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने होर्डिंग्जचे सर्वेक्षण आणि निष्कासनाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. सहआयुक्त हिंमत खराडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात आहे. पीएमआरडीए क्षेत्राची ‘तहसीलदार पूर्व’ आणि ‘तहसीलदार पश्चिम’ अशा दोन विभागांत विभागणी करून कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. तहसीलदार (पूर्व) कार्यक्षेत्रात आतापर्यंत २८४ होर्डिंग्जचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये १३३ होर्डिंगधारकांना नोटिसा दिल्या असून ९३ अनधिकृत होर्डिंग्ज हटवली आहेत. हवेली (पूर्व) तालुक्यात सर्वाधिक ५२ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे. पुरंदरमध्ये १४, दौंडमध्ये १३, खेडमध्ये ७ आणि भोरमध्ये ७ होर्डिंग्ज हटवले आहेत. शिरूर तालुक्यात ८१ होर्डिंग्जचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, तेथील कारवाईचा पुढील टप्पा लवकरच राबविण्यात येणार आहे. तहसीलदार (पश्चिम) कार्यक्षेत्रात ५४४ होर्डिंग्जचे सर्वेक्षण झाले आहे. यामध्ये २३८ होर्डिंगधारकांना नोटिसा दिल्या आहेत. आतापर्यंत ४१ अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासित केली आहेत. मुळशी (दक्षिण व उत्तर) तालुक्यात २३, मावळमध्ये १३ आणि हवेली (पश्चिम) तालुक्यात ५ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ही मोहीम यापुढे अधिक तीव्र केली जाणार आहे. नोटीस मिळूनही निर्धारित मुदतीत स्वतःहून होर्डिंग न हटविल्यास पीएमआरडीएकडून ते निष्कासित करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली जाईल. - हिंमत खराडे, सहआयुक्त, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, पीएमआरडीए





















